Saturday, 14 July 2012

अष्टविनायक पदयात्रेने आम्हास काय दिले......

अष्टविनायक  पदयात्रेने आम्हास काय दिले ?.
                          १) मानसिक   समाधान
                          २) आत्मिक बळ 
                          ३) मानवी स्वभावाचे असामान्य दर्शन
                          ४) जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन .
                          ५) शारीरिक क्षमता चाचणी
                          ६) सामाजिक सन्मान

आम्ही कूठे कमी पडलो!
                           १) एकमेका मधील एकात्मतेचा अभाव
                            २)पौष्टिक आहाराची उणीव
                            ३)वेळ आणि अंतराचे बंधन जास्त झाले.
                            ४) अधिक सराव हवा होता

विघ्नेश्वर- ओझर- 7 आणी गिरिजात्मज-लेण्याद्री- 8

२-३-९५ गुरुवार

सर्व तयारी करून बाहेर पडायला उशीर झाला होता. मंदिराची किल्ली देण्यास श्री. शिंदे ह्यांचे कडे गेलो. चहाचा आग्रह झाला. इतर मंडळी जमा झाली होती. गाववेशी पर्यंत सोडायला मंडळी आली होती. आता पारगाव ;शिगवे; नागापूर; रांजणी मार्गे नारायणगाव गाठ्वायाचे होते. एकूण ३२ किमी. अंतर होते. इप्सित जवळजवळ येत होते. वाटेत नास्ता झाला पारगावला १२.३० ला पोहचलो. येथे घोडनदी व मीना नदीचा संगम आहे. नदीवर बांध आहे. स्नान आटोपले. गणेश वस्ती आली, इथे श्री.करंडे ह्यांनी शेजाऱ्या कडून गरम भाकऱ्या करवून घेतल्या व आम्हास जेवू घातले. रांजणगावापासून सौ.सुनीताचे पायावर थोडी सूज आली होती, दोन्ही गुडघे दुखत होते त्यामुळे गती कमी झाली होती. उठबसकरताना त्रास होत होता पण एकदा उभे राहील की चालता येत होतं! नारायणगाव पर्यंत जाणे जरुरीचे होते कारण तेथे बऱ्यापैकी हॉटेल मिळणार होते. सूर्यास्त झाल्यावर प्रवास बन्द हा नियम आज मोडला. गावात लाईट नव्हते. धनगरी कुत्र्यांचा त्रास वाढला. एस. टी. डेपो जवळ नंदनवन हॉटेलमध्ये रूम घेतली. संडास ,बाथरूम कॉमन व गरम पाण्याचा अभाव. हॉटेल नंदनवन सारखे भासले नाही. पहाटे थोडी थंडी जाणवली. रात्री इतके थकलो होतो की जेवण पण केले नाही. आमचे शरीर म्हणजे चालणारे यंत्र अशी अवस्था झाली होती. उद्या जिद्दीने शेवटची चढाई करायची होती. अंतर कमी होतं व मानसिक तणाव कमी झाला होता.

३-३-९५ शुक्रवार
                     नारायणगाव --ओझर हे अंतर फक्त १२ किमी आहे. सकाळी उशिरा निघालो बाहेर टपरीत चहा घेतला. आमचा हॉटेलचा अनुभव ऐकून तो टपरीवाला म्हणाला" नुसते नावाचे नंदनवन", मालक अजिबात लक्ष घालत नाही. नोकर शिरजोर  झाले आहेत.
रस्ता डांबरी होता दोन्ही बाजूस घनदाट नव्हे पण तुरळक झाडी होती. बागायती जमीन म्हणून हवा पण गार होती. आर्वी ह्या सॅटेलाइट केंद्राचे अॅनटेना चारी बाजूस दिसत होते. हळूहळू ओझर जवळ आले. कुकडी नदीचे पाणी व मंदिराचा कळस दिसू लागला पण पूर्ण वळसा घेवून मंदिरात पोहचण्यास १०-३० झाले. गरम पाणी, राहण्याची सोय झाली. शुचिर्भूत  होऊन  विघ्नेशाचे दर्शन घेतले.  

सौ.सुनीताच्या  पायावरील सूज वाढली होती. मंदिरातून येताना एक आयुर्वेदिक औषधाचे दुकान दिसले होते. ह्या सुजेवर जर दुख:दबाव  लेप लावला तर ? सुनीताला तर झोप लागली होती. बाहेर पडलो लेप घेवून आलो आणि तिच्या पायाला, गुडघ्याला व घोट्याला लेप लावला. क्रेप बान्डेज बांधलं. औषधाची गोळी दिली. जेवणाची काही सोय होते का हे बघण्यास बाहेर पडलो. जेवण नाही पण मिठाई अन फळे मिळाली .  थोडी विश्रांती घेतली.३-३० चे सुमारास पुन्हा एक वार दर्शन केले आणि कालव्याचे बाजूने लेण्याद्रीला जाण्यास निघालो आतापावेतो जवळजवळ ५०० किमी. अंतर पार झाले होते शेवटचे काही किमी. बाकी होते. तेच अंतर फार आहे असे वाटत होते. म्हणतात ना शिजेपर्यंत धीर धरवतो पण निवेपर्यंत नाही. आमचीही गत तशी झाली होती. सभोवार द्राक्षाचे मळे होते. हिरवीगार वनश्री होती. वाटेत १०वी  इयत्ते तील  काही मुली भेटल्या. त्याचे समवेत गप्पा मारीत श्रीमती शकुंतलाबाई जाधव ह्यांच्या १५ एकरांच्या द्राक्ष मळ्यावर पोहचलो. दृष्ट लागावा इतका तो छान होता.  त्यांचा चहाचा आग्रह झाला. पण द्राक्षांचा मोह सोडवला नाही. थॉमसन सीडलेस ,काळी साहेबी हे दोन प्रकार चाखले. हातात एक एक किलोचा घड ठेवला व "जाता जाता खा म्हणजे रस्ता पण लवकर संपेल" असे म्हणाल्या!

हळूहळू सूर्यास्ताची वेळ आली.संध्या रंगात शिवनेरी व लेण्याद्री  ह्या दोन्ही गडांना  सोनेरी मुलामा चढला. गडावरील अवशेष दिसू लागले पण लेण्याद्री पायथा अजून ३ किमी. दूर होता. उठबस करीत शेवटची १०० मी .चढण पूर्ण करून सौ सुनिता थांबली. माझे सामान तिचे जवळ देवून मी विश्वतांच्या ऑफिस मध्ये गेलो.  आमचा वृतांत ऐकून  मंडळी मंत्रमुग्ध झाली. सगळी सोय उत्तम होईल ह्याची हमी दिली; चहा दिला व सामान वाहून नेण्यास एक माणूस बरोबर दिला. जवळच्या हॉटेल मध्ये मुंबईहून आलेल्या यात्रेकरूंचे जेवण होत होते. त्यात आमची वर्णी लागली. ८-३० वाजता चारीठाव सुग्रास भोजन मिळाले. आमचे ध्येय शिखर तर आम्ही गाठले होत! पण साध्य नव्हत झालं! त्यासाठी सकाळ पर्यंत वाट पहावी लागणार होती. इतक्यात सौ.सुनीताने एक पाटी दाखविली त्यावर लिहिले होते "समय से पहिले और तकदीरसे ज्यादा कुछ नाही मिलेगा ". तो जणू आम्हांला संदेश वाटला .खोलीवर आलो व झोपी गेलो .

४-३-९५ शनिवार

सकाळी ४ वा.जाग आली. मुंबईकर पुढच्या प्रवासाला निघणार होते. गरम पाण्यासाठी भट्टी पेटली होती. त्याचा आवाज शांतता भंग करीत होता. आम्हांला घाई नव्हती. ७ वा उठलो, तयारी केली. गरमगरम कांदे पोहे ,चहा  तयार होता. आस्वाद घेतला आणि लेण्याद्रीच्या पायऱ्या चढण्यास सुरवात केली. ८-१५ सुमारास वर पोहचलो.

गिरिजात्मजाचे  दर्शन झाले, लोटांगण घातले, जमिनीवर लोळू लागलो. डोळ्यात  अश्रूंची दाटी झाली. अन् मन शांत झाले. अथर्वशीर्ष  म्हटले, आरती केली ,ॐकर जप केला. यात्रा पूर्ण केल्याचा आनंद आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर झळकू लागला. जिद्दीने यात्रा पूर्ण केली म्हणून सौ. सुनीताचे अभिनंदन केले. संत तुकोबाची वाणी आठवली "ह्याचसाठी  केला अट्टाहास........
 श्री चरणी एकवार वंदन करून पायऱ्या उतरू लागलो.  ११ वा .जुन्नरला जाणारी गाडी आली. तेथून कल्याण व नंतर दुपारी  ५-३० ला डोंबिवलीला पोहचलो. ग्रामदेवतेचे दर्शन करून घरी पोहचलो. चि .समीर व चि.सौ सुषमा आनंदित झाले. सुनीताचा ताबा सुषमाने घेतला व पायाच्या दुखण्यावर उपचार सुरु झाले!
सर्वत्र कौतुक झाले ,मनाला उभारी आली ..................

.श्री चरणी अर्पण ..

महागणपती - रांजणगाव - 6

२७-२-९५    सोमवार   (महाशिवरात्र)

सिद्धटेक मुक्कामी रात्री झोप तर छान झाली. लोकांनी केलेल्या कौतुकाने अंगावर मुठभर मांस चढले होते.
६-३० वाजता श्रीं च दर्शन घेतले. भीमेच्या काठावर आलो पण अजून नावाड्याचा पत्ता नव्हता. इतक्यात २-३ गावकरी आले, त्यांनी नाव किनारी आणली. त्यांचे बरोबर वल्ही कशी मारावयाची हे शिकत नदीपार केली. उतरताच सिद्धीविनायाकास हात जोडले अन पावले लिंपणगावाकडे चालू लागली .वडगाव इथे एका मळ्यात उसाचे गुऱ्हाळ चालू होते. सौ. सुनीताला ते बघावयाचे होते. आत शिरलो, मंडळीना रामराम घातला. लगेच विचार पूस झाली,अन रसाची लोटी हाती आली. भट्टी सकाळी २वा.सुरु होते. रात्री १०पर्यंत चालते. एक काहिली रस आटविण्यास ४-५ तास लागतात. गुळाची ढेप कशी पडतात ते ही पाहीले. डोक्यात सामान्य ज्ञानाची,पोटात रसाची,आणि ब्यागमध्ये ताज्या गुळाची भर पडली. नमुना म्हणून! वजन वाढण्याची  भीती ! वडगाव  नंतर अज्नून आलं, वाटेत महादेवाचे दर्शनाला जाणारी मंडळी भेटत होती. आनंदवाडी फाटा ओलांडला आता मुन्डेकर वाडी अन पुढे २ कि.मी. वर लिंपणगाव. प्रवास वेळेनुसार सुरु होता. मुन्डेकर वाडीत शिरताच एक गावकरी म्हणाला त्या वडाच्या झाडाकडे जा. इतक्यात बाजूच्या घराच्या ओसरीतून हाका ऐकू आल्या हे घर म्हणजेच श्री पुरोहिताची सासुरवाडी. ओसरीवर ४ ते ६०  वर्षे वयाची १०-१२ मंडळी उभी होती. स्नान आटोपले अन २-३० वा.फराळाची ताटे समोर आली. ताटभर निरनिराळे उपासाचे पदार्थ पाहून हा थाट काही औरच असल्याचे जाणवले. वर रु ११/- दक्षिणा  मिळाली. अनाहूत पाहुण्याच्या रुपात त्यांना आम्ही शिवपार्वती भासलो असे त्यांनी सांगितले. विश्रांती नंतर हेमाडपंथी शिवमंदिरास जावून आलो. श्री कुलकर्णी (पुरोहिताचे सासरे) ह्यांचा गावात १६ खणी वाडा आहे. १० एकरात  ऊसाची लागवड आहे. गोठ्यात १०-१२ दुभती जनावरे आहेत. रात्री तेथे  थांबण्याचा आग्रह झाला अन आम्हालाही तो मोडता आला नाही. शिवाय २७ किमी इतका प्रवास झाला होताच.
२८-२-९५    मंगळवार
                               श्री.कुलकर्णी  मंडळींचा निरोप घेवून निघालो. ह्या पुढील प्रवास मात्र कोलंबसच्या प्रवासारखा होता. मार्ग अन् प्रदेश ह्याबद्दल काहीच माहिती नव्हती. कुलकर्णी ह्यांच्या शेत जमिनी जवळून जाणाऱ्या कालव्या जवळून ७ किमी गेलो व काष्टी गावी पोहचलो. न्याहारी झाली पुढे निर्वी इथे गावकरी मंडळीशी बोलताना गुनाठ ह्या गावी माझ्या बहिणीकडे मुक्काम करा असे सांगून एकाने पत्र देवून मार्गदर्शन केले. कोरडी नदी ओलांडून तांदळी ह्या गावी पोहचलो. पुढे १०-१२ किमी अंतरात गाव होती पण सडकेच्या बाजूला आंतमध्ये होती. म्हणून चालत  राहिलो. इतक्यात काही गावकरी भेटले त्यांना मार्ग विचारला तेंव्हा आपण रस्ता चुकल्याचे लक्षात आले. कपाळावर हात मारून घेतला. आता काय पर्याय ? त्यांचे कडून इतकेच समजले की दोनच गोष्टी आमच्या हाती आहेत. एक तर मागे १० कि.मी. जावून योग्य मार्ग घेणे किंवा पुढे नाव्हारा फाट्या वरून रांजणगाव गाठावे. पण हे अंतर एक दिवसात पूर्ण होणे शक्य नव्हते. तेंव्हा आन्दलगाव पर्यंत जावे. पण तेथून शिरूर ला जावे. खरे तर शिरूर आमचे  मार्गात नव्हते. पण जवळचे पैसे ही संपले होते. बँकेत जाणे भाग  होते. आलीया भोगाशी. .....दुसर काय? चूक कोणाची? आधी चौकशी का केली नाही? इतका आत्मविश्वास कसा वाटला? दोघा मधील वाद मिटत नव्हता. अंतर कटत होतं. शेवटी ३८ कि.मी. अंतर पूर्ण करून आन्दलगाव गाठलं! बसने शिरूरला गेलो. बँक चे काम झाले. जैन हॉटेलमधे राहिलो.

                         खरंतर  जर आमचा मार्ग बरोबर असता तर लिंपणगाव-रांजणगाव  हे अंतर ४८ कि.मी. होते व ते दोन दिवसात पूर्ण करावयाचे होते. पण आत्ता ६० कि.मी. अंतर पार करावे लागणार होते. म्हणजे १२ किमी. किंवा ३-४ तासांचा जादा प्रवास.

१-३-९५ बुधवार.

शरीराला अन मनाला आता इतकी सवय झाली होती की खोगीर चढवता जसे घोडे फुरफुरू लागते, तसे सॅक पाठीवर घेताच पावलं अष्टविनायकाची वाट चालू लागावयाची. सिद्धटेक नंतर फक्त तीन गणपती राहिले हा विचार मनात आला की यात्रा सिद्ध होणार ह्याची खात्री वाटू लागे. आजचा रस्ता डांबरी असून बाजूस छाया देणारी झाडे होती .रस्ता चुकण्याची भीती नव्हती .कालच्या प्रसंगाची उजळणी पुन्हा एकवार मनाशी झाली. शेवटी त्या एकाट व शिंदी  वनातून जाणाऱ्या रस्त्यापेक्षा हा छान रस्ता तर मिळाला ह्यावर समाधान मानून घेतले. वाटेत प्रवासात अनेक जैन श्रावक भेटत होते. ते अनवाणी चालतात व दिवस भरात २०-२५ किमी अंतर पार करतात. आज दिसलेले श्रावक कापडी पादत्राणे वापरत होते. एक तर व्हील खुर्चीतून जात होते.
                                 साधारण ११ वा. रांजणगावला पोहचलो. दर्शन करून एका ढाब्यावर जेवलो. परत मंदिरात आलो. वीज नसल्याने जनरेटर सुरु होता. त्या आवाजात विश्रांती शक्य नव्हती आता १२ किमी पूर्ण करून मलठणला जावयाचे होते. राज मार्ग सोडला आणि शेतीतून पठारावर आलो पठारावर झाडे तर नव्हती पण माणसांची चाहूलही नव्हती. तोंडावर येणारे सूर्य किरण त्रास देत होते .पन्हाळगड ते विशालगडला जाताना लागणारे म्हसाईचे पठार आठवले.


 उजाड भकास माळरान, तळपणारे ऊन, मरगळलेले मन ,ठणकणारे पाय अन पडलेला वारा चालण्याची गती ही वाढेना. हळूहळू अंतर कटत गेलं आणि उतार सुरु झाला. इथे सोनसंगवे नावाचे गाव लागले. गावकरी भेटले. आम्ही डोंबिवलीहून निघाल्याचे सांगताच मंडळी हसू लागली; कारण विचारले तर समजले कि येथील ५-५० जण डोंबिवली येथे राजाजी पथावर राहतात. आंब्याचे दिवसात आंबे, नाहीतर आवळे व इतर  मसाल्याचे पदार्थ विकतात. संध्या छाया पसरू लागताच वारा पण सुटला मलठण जवळ आल्याची चिन्हे दिसू लागली. गावाच्या वेशीत प्रवेश करताच जे गृहस्थ प्रथम दिसले त्यांचे जवळ "गावात रात्रीचे मुक्कामाची काही सोय होईल का?"  ही विचारणा केली. श्री शिंदे ह्यांनी राम मंदिरात सोय होईल असे सांगितले इतकेच नव्हे तर राम मंदिराची वाट दाखवली, गाभाऱ्याची किल्ली दिली आणि रात्री भोजनास घरी या असे आग्रहाचे निमंत्रण दिले .चहापाना नंतर मंदिरात गेलो. ८-८.३० पर्यंत वीज येईल. तेव्हा आराम करा असे म्हणाले .थोडी थकावट दूर करण्यास हातपाय धुतले. जवळच्या मेणबत्या काढल्या त्या पेटवल्या रोषणाई झाली आणि रामरक्षा म्हणावयास सुरवात केली. काही चाहूल लागली म्हणून थांबलो तर ४-५ गावकरी मंडळी आत आली त्यांनी आमचे साठी चहा करून आणला होता. श्री. पांडुरंग शास्त्री  आठवले ह्यांचे स्वाध्याय  मंडळ  इथे आहे. आलेली मंडळी त्यापैकी होती. वीज आली, श्री शिंदे आम्हास भोजनास घेवून गेले. जेवून परत आलो तेंव्हा ही मंडळी आमचे साठी पाय शेकण्यास गरम पाणी घेवून आलेली होती. रात्री थंडी वाजू नये म्हणून काही चादरी देखील त्यांनी दिल्या. त्यांच्या ह्या प्रेमाने आम्ही उभयता भारावून गेलो आणि आमच्या डोळ्यात प्रेमाश्रू आले. मानवी स्वभावाचे मनोज्ञ दर्शन आम्हास झाले. रात्री पायाची निगा घेवून गाढ झोपी गेलो.

Sunday, 8 July 2012

वृत्तपत्र प्रसिद्धी - Times of India

Published in  the TIMES  OF  INDIA

सिद्धिविनायक -सिद्धटेक-5

पदयात्रेची सुरुवात इथे वाचू शकाल.....


सौ. सुनीताची एक मैत्रीणीचे  (भजनी मंडळ ग्रुप मधील) श्री देशमुख हे नातेवाईक. गावाबाहेर शाळेत चौकशी केली. ते नुकतेच घरी गेले असे समजले. त्यांच्या घरी गेलो. ते अजून घरी आले नव्हते. त्याचे दोन भाऊ घरात होते . सौ देशमुख मोरगावला गेल्या होत्या . आम्ही जरी अनाहूत पाहुणे असलो तरी योग्य बडदास्त  ठेवली . सौ देशमुख  बाईना जेव्हा  मोरगावी  समजले की मुंबईचे एक जोडपे त्यांच्या घरी सुप्याला  गेले आहे तेव्हा त्या तातडीने परत आल्या . ह्या गावी पाण्याचा दुष्काळ आहे .पाण्याची सोय टॅन्करने होते.  गावात एक दर्गा आहे त्याला फार मान आहे. एक भुईकोट किल्ला आहे हिंदू व मुसलमान लोक गुण्या गोविंदाने राहतात. तुम्ही ह्या कशाची काळजी करू नका. थकला असाल! आराम करा ! घरच्या गाडीवर टाकी बसविलेली आहे शेतातून पाणी आणले जाते. त्यांच्या बोलण्याने उभारी आली. आम्ही कोण कुठले फक्त यात्रेकरू पण किती मनोभावे व आदराने सेवा करीत होते ते जाणवले . भोजना नंतर शांत झोप आली.

 २५-२-९५     शनिवार

                                 सकाळी ५-३० वा. जाग आली. स्नानासाठी  गरम पाणी तयार होते .झटपट तयारी केली. देशमुख सरांचा निरोप घेतला. सुपा ते पडवी फाटा हे ६ कि.मी. गेल्यावर, उजवीकडे वळून कुसगाव मार्गे पाटस ,दौंड कडे जाता येते. डावीकडे वळल्यास ५ कि.मी. अंतरावर नारायण बेट हे दत्त संप्रदायाचे ठिकाण आहे. आम्ही पडवी पूर्वी एक पायवाट धरली .३ कि.मी.अंतर वाचले . एका  ठिकाणी चांगला चहा  मिळाला . प्रवासात दिसून येणाऱ्या पशु पक्षांची माहिती मी सुनीतास पुरवीत होतो. अर्थात मला फार माहिती होती असे नाही पण थोडी अधिक आहे इतकच. आतापावेतो १०-१२ प्रकारचे पक्षी जे शहरांत दिसत नाहीत ते दिसले होते . तेव्हड्यात एक चितळ २०० फुटावरून  पळत आले . प्रथम मलाही ते पाळीव असेल असे वाटले .पण आम्ही  जवळ जाताच चौखूर उधळून समोरच्या  टेकडीवर नाहीसे झाले . आमच्या प्रवासात  भेटलेला हा एकमेव वन्य प्राणी. बघता बघता कुसेगाव आले . इथे श्री पांडुरंग  शितोळे ह्या निवृत्त  सैनिकाची भेट झाली . चहा झाला. आम्ही पाटस कडे निघालो साखर कारखाना दिसत होता . गेटवर छान सावली होती . थोडी विश्रांती घेतली कॅन्टीन मध्ये जेवण मिळेल हे समजले .पण पुढे ५ कि.मी. गेल्यास  गावात मनासारखे जेवण घेता येईल म्हणून पुढे निघालो. पाटस येथे छान जेवण मिळाले. दहीपण मिळाले. जेवण घेवून डांबरी सडकेने निघलो मोठ्या वृक्षांची घनदाट छाया होती. सुनिता म्हणाली देखील की "अशी छाया असेल तर दुपारचेही चालता येईल" . पण हे  भाग्य कुठलं. ५०० यार्डाचे  अंतर गेल्यावर दौंड फाटा आला. पुढे  चांगला रस्ता लागेल ह्या आशेने पुढे झालो, पण लक्षात आलं की प्रवासातील हा अत्यंत दुर्धर टप्पा. ११ कि.मी. अंतरात रस्त्याच्याकडेला छाया देणारे एक पण  झाड नव्हते . होती ती बाभळीची खुरटी  रोप . दूर एका शेतात आंब्याच्या सावलीत शेतकरी कुटुंब विश्रांती घेत होत तिथे पोहचलो. थंडगार पाणी, ओला हरभरा मिळाला. थोडी विश्रांती घेवून डोक्यावर ओले पंचे घेवून मार्गक्रमणा सुरु केली.
दौंड परिसर आता दिसू लागला होता. "दौंड हे गाव गुंडगिरीसाठी प्रसिद्ध आहे , तेव्हा जपून" ही सावधगिरीची सूचना आधीच मिळालेली होती. सावध होतो. गावात समर्थ लॉज हे उतरण्याचे एकमेव ठिकाण. नाहीतर बारामती खेरीज कुठे सोय होणार नव्हती. मिळाली ती खोली घेवून  मुक्काम ठोकला. पी .टी शूज खरेदी केले. बुटाला झिजून भोक पडले होते. घरी फोन केला. कपडे धुतले. जेवून झोपी गेलो.

२६-२-९५   रविवार
                              सकाळी ६ वा.तयार होवून बाहेर पडलो आणि शिरपूरची वाट धरली. उन्हाखेरीज कशाचा त्रास झाला नाही. प्रथम देऊळगाव व नंतर शिरपूर लागलं. दुपारचे १२ वाजत  होते. रविवारला जोडून सोमवारची महाशिवरात्रीची सुट्टी होती म्हणून मुंबई, पुणे येथील यात्रा कंपनीच्या बस गाड्या सकाळपासून आल्या होत्या. एका कंपनीची १०० माणसांची जेवणाची तयारी सुरु होती. यात्रेकरू दर्शनासाठी मंदिरात गेले होते. भीमा ओलांडून नावेने जावयाचे होते. आमच्या भोजनाची सोय  त्यांच्यामध्येच केली व तेथे मिळत असलेल्या लिंबू सरबताचे २-४ पेले रिचवले. आमच्या पदयात्रेचे वृत त्यांना कळताच, आम्हाला घेराव घातला गेला. प्रश्नोत्तरे झाली. कौतुक झाले .आमच्या मुलाच्या कंपनीतील एक सहकारी आणि मला ओळखणारे एक ,दोन जण भेटले. ४-३० वा .भीमा ओलांडून सिद्धटेक येथे पोहचलो. तिथे असलेल्या धर्मशाळेवजा लॉजमधे एक खोली घेतली. पदयात्री म्हणताच चहा फुकट व खोली भाडे ५०% सूट मिळाली . मंदिरात गेलो . गप्पा सुरु झाल्या. येथील श्री पुरोहित ह्यांनी आम्हा उभयताचे कौतुक केले. ते म्हणाले "माझी सासुरवाडी लिंपणगाव येथे आहे. हे गाव       महादेवाचे जागृत स्थान आहे. तुम्हाला ४ किमी वाट वाकडी करावी लागेल इतकेच,तुम्ही फक्त हो म्हणा! तुमची सगळी बडदास्त माझेकडे!" आम्हाला नाही म्हणवले नाही.शेजआरती नंतर मंदिरातून परत आलो.






त्याआधी संध्याकाळी धर्मशाळेत एक लग्नाचा समारंभ होता. मंडळी श्रीगोंदा येथील होती. आमच्या सारखे अनाहुत पाहुणे त्यांना आवश्यक वाटत होते. आम्हाला बरच काही अध्यात्म समजत असा त्यांचा गैरसमज झाला होता. आम्हाला भोजनाचे निमंत्रण होते. अधिक गैरसमज नको म्हणून भोजनास गेलो. नवरदेवास भेट पाकीट दिले. मंडळी फार आनंदित झाली. जेवून बाहेर आलो व एका पुस्तकाचे दुकानात काही तरी चाळत होतो इतक्यात माझे नावाने मोठमोठ्याने कुणीतरी हाक मारत होते. सौ.सुनीताला काही झाले कि काय ही भीती वाटली, आणि मी बिवलकर इथे आहे असे जोरात ओरडलो. एक गृहस्थ आले व मला कडकडून भेटले. तुम्ही अष्टविनायक यात्रा चालत करता आहात हे समजले म्हणून ही गळाभेट. "मी भाऊ बिवलकर, माझी सागर  travel   नावाची कंपनी आहे". गाडीभर यात्रेकरू त्यांच्या  कंपनी बरोबर होते.आजचा हा कितवा गणपती ? . मी म्हणालो "पाचवा ,अजून तीन बाकी आहेत.२/३ प्रवास आम्ही पूर्ण केला अजुन१/३ बाकी आहे. ३७५ किमी झाले आहे १२५ किमी अजून चालवायचे आहे तेंव्हा कसलं अभिनंदन अन कौतुक करता"!
"अरे!! असे म्हणू नका तुमची ही हिम्मत व धडाडी पाहून आम्ही थक्क झालो आहोत.तुमचे पाय धरवायाचे आहेत", ह्या वेळेपावेतो सगळ्यांनी घेरून टाकल होतं. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुम्ही थकला नसाल तर आणि परवानगी असेल तर ? होकार देताच, प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली.
 १) ही कल्पना कशी व कधी सुचली ?
२) पद यात्रा करण्यची ही पहिलीच वेळ का ?
३)आधी सराव केला होता का?
४)दररोज किती वेळ चालता? किती अंतर पूर्ण करता ?
५)जेवणाचे काय करता ?
६) रात्री कुठे थांबता ? अजून किती दिवस लागतील ?
७)बरोबर किती वजन असते ?
८)प्रवासात त्रास कितपत झाला?
 आम्हाला प्रत्येक ठिकाणी ह्याच प्रश्नांनी भंडावलं होतं. त्यामुळे उत्तरे तयार होती. सगळ्या समवेत फोटो झाले.पत्ते, फोन नंबर ह्यांची देवाणघेवाण झाली व  मंडळीनी निरोप घेतला.