पदयात्रेची सुरुवात इथे वाचू शकाल.
१७-२-१९९५...
सुधागड जवळ आला होता पण त्याला पूर्ण वळसा घातल्यावरच मंदिरात पोहोचणार होतो . सकाळी निघावयास उशीर झाल्याने सलग २ तासापेक्षा अधिक विश्रांती घेतली नव्हती. संध्याकाळ होताच दिवसभराचे श्रम चांगलेच जाणवू लागले होते .चालणं अशक्य वाटू लागलं होतं. पदयात्रेला सुरवात केल्या पासून हा सगळ्यात अधिक अंतराचा टप्पा होता.सायंकाळी फिरावयास बाहेर पडलेली मंडळी दिसू लागली होती. त्यांच्या कडून मंदिर ३-४ किमी दूर असल्याचे समजले अन पुलाच्या कट्ट्यावर बसकण घेतली. पुन्हा धीराने मनाला उभारी दिली अन नेटाने पुढे निघालो. तेथील शाळेतील एक शिक्षक भेटले. त्यांचे बरोबर बोलत हे अंतर पार करून श्री धुंडीराजाचे मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर पालीच्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात गेलो .थंडगार फरसबंदीवर पाय पसरून बसताच शीण कमी होत असल्याचे जाणवले .आमच्या पदयात्रेचे प्रयोजन सांगताच राहण्याची जेवण्याची सर्व सोय उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी मान्य केली . पुढील १ तासात स्नानकरून देव दर्शन घेतले आणि भोजन करून मंदिरात दिलेल्या खोलीत गेलो शरीर ठणकत असल्याचे जाणवत होते, झोप येण्याची काही चिन्हे दिसत नव्हती ! उद्या संकष्टी आहे. परत इतकं अंतर चालवायचे आहे; जमेल का ? विचार करून मन थकलं अन् कधी झोप लागली ते कळले नाही.
१८-२-१९९५ शनिवार
नेहमीप्रमाणे सकाळी ५ वा जाग आली सर्व अष्टविनायकांचे मंदिराजवळ सुलभ शौचालयाची व स्नानगृहाची सोय मुंबई महानगर पालिकेच्या सौजन्याने केलेली आहे. पूर्वी ही सोय नव्हती तेंव्हा फार त्रास व्हावयाचा .चहापाणी देवदर्शन पूर्ण होई पर्यंत ७-३० वाजले होते. मनाला आणि शरीराला तयार केले आणि पालीचा निरोप घेतला .वाटेत चि. सौ .सुषमाला फोन केला खुशाली कळवली. एक तासात रेसल कंपनी च्या व्दारी पोहचलो न्याहारी झाली अन पुढे निघालो .पेडलीच्या जवळपास आलो. एक इसम घाई घाईने सायकलवरून आला आणि पायउतार झाला अन म्हणाला आप कौन है? कहाँ जा रहे हो ? त्याच्या फाटक्या शरीराकडे पाहून ह्याचे पासून काही धोका होईल असे वाटले नाही. त्याचे पेक्षा आवाज चढवून आणि हातामध्ये असलेला २ फुटाचा टोर्च सरसावून मी जोशात विचारले आप कौन है ? क्या चाहते हो ? माझ्या हॉवरसॅककडे पाहत तो म्हणाला" वो लोग कहते है कि आप हिंग बेचते है". त्याला म्हटलं अरे भाई आपकी कुछ गलतफहमी हो गई है ? हम् हिंग बेचते नही, हिंग लगाते है ! मराठीमध्ये शेंडी लावणे ह्या प्रकारास हिंदी मधे हिंग लगाना असे संबोधले जाते. त्याच्या पाठीवर थोपटून इतरांनी त्याचा कसा मामा बनवला ते सांगितले.
माझ्या वाढलेल्या दाढीवर हाथ फिरवीत सौ .ला म्हणालो "हा माझ्या दाढीचा परिणाम असावा". मध्ये चहापानाचा कार्यक्रम झाला अन् कानसळ खेडे ओलांडून ३-४ किमी पुढे आलो असू, खणलेल्या सडकेमुळे वाहनांची कोंडी झाली होती. बाजूला झाडाच्या सावलीत विसावलो. इतक्यात एक जीप थांबली आणि कोणीतरी हाक मारत असल्याचे जाणवले. त्या जीप चालकाचा गैरसमज दूर करावा म्हणून गाडीकडे जावू लागलो तो आतून शिव्यांचा भडीमार सुरु झाला होता. कोण हा धटिंगण?
हे बघण्यास आत डोकावलो तर तो माझा वायुसेनेतील व डोंबिवलीत राहणारा मित्र श्री. कदम निघाला गेल्या संपूर्ण एक वर्षात तोंड न दाखवल्याने शिव्या घालत होता .मुकाट्याने गाडीत बसा. कुठे निघालात ह्या वेळेला ?काही बोलण्या पूर्वी तो बाहेर आला न दोघांच्या सॅक गाडीत टाकल्या पण जेंव्हा आमच्या पदयात्रेची कहाणी ऐकवली तेंव्हा तो खुष झाला. म्हणाला" मला माहित आहे तुझं डोकं अस काहीतरी नक्की ठरवत असणार. तूझा उपक्रम स्तुत्य आहे .तू नक्कीच पार पाडणार. ह्याच रस्त्यावर मी एक फार्महौस विकत घेतले आहे तिथे चल,ते बघ ,जेवण कर मग मी तुला इथे आणून सोडतो .त्याच्या फार्महौसच्या अन्नावर माझे नाव लिहिलेले असावे.! ह्या प्रकाराने मुक्कामावर पोहचण्यास उशीर होणार होता.
मध्ये पेडली येथे बोरं विकत घेतली. कारगावात राहणाऱ्या सौ .फुलवंती सकपाळ ह्या काल भेटलेल्या बाईकडे चहाचे निमंत्रण होते ना! बाई अजून भाजी विकून परतलेल्या नव्हत्या .तिच्या लहानग्या कडे निरोप ठेवला आणि खोपोलीच्या दिशेने वाटचाल सुरु केली. एव्हाना २०-२५ किमी चालून झाले होते. उन्हाचा ताप अन प्रवासाचा शीण जाणवत होता. कसंही करून अंधार पडण्यापूर्वी जंगलातून बाहेर पडावयाचे होते. सौ .सुनीताचे पायावर आलेले फोड त्रास देत होते पुढचा एक तास तरी गती अशीच ठेवणे जरूर होते .आता एकच उपाय; जय गजानन! श्री गजानन! असे उच्चारण करत मार्गी चालणे . मंत्राबरोबर गती वाढत गेली अन जंगल पार झाले. खोपोलीचा रस्ता रहदारीचा होता व सडकेवर दिवेही होते.
पाली फाट्यावर पोहचण्यास ७-७:३० झाले. सौ. फारच थकून गेली होती. पोटामध्ये दुपारपासून अन्नाचा कणपण गेला नव्हता. चतुर्थीचा उपास फार कडक झाला होता, शरीर थकलं होतं .संध्याकाळ फार उदासवाणी भासत होती. खरच हे अवघड कार्य आपल्याने पूर्ण होणार कि नाही ही चिंता वाटू लागली होती .दररोज ३०-३२ किमी हे अंतर झेपणार कि नाही ?प्रवास एक महिना आधी सुरु करावयास हवा होता कि काय ?पायामध्ये बूट घालून चालण्याचा अधिक सराव करावयास हवा होता काय ? इत्यादी प्रश्न भेडसावू लागले होते ?काय गरज होती ह्या पायापिटीची ?ह्यापासून आनंद होण्या पेक्षा दुख:च अधिक होणार कि काय असे वाटू लागले! निराशामय विचारांचा मनात कल्लोळ झाला .दोघांनी निघण्यात चूक केली की काय ? असे वाटू लागले .४-५ जणांचा समावेश करून घ्यावयास हवा होता ! टपरीवर चहा घेतला आणि उरलेलं ४-५ किमी चे अंतर २ तासात कसेबसे पूर्ण केले. एका कट्ट्यावर समान ठेवले रिक्षा केली आणि एक हॉटेलमधे रूम घेतली. सुनीताने रूम मध्ये जाताच पायाचे फोड पंक्चर केले. आता पायाची आग वाढली. तिच्यासाठी अँटीबाओटीक गोळ्या व पुनर्जल आदि औषधॆ घेवून आलो. जेवण घेवून रूमवर आलो .पोटामध्ये अन्न जाताच जरा बरे वाटले पाण्यात पाय ठेवून बरे वाटले, आग कमी झाली . मला चटकन झोप लागली पण ती ३-३० पर्यंत तळमळत होती.
पुढील भाग - थेऊर ; इथे वाचता येईल.
aba masta lihilay .. punha he ikun tevadhach achamba watala!!
ReplyDelete