Sunday, 17 June 2012

मोरेश्वर -मोरगाव --4

पदयात्रेची सुरुवात इथे वाचू शकाल.

उरळीकांचन अजून ६-७ किमी. दूर होते. काही जवळचा मार्ग आहे का, हे विचारण्यास ; कोणी आजू बाजूस  दिसते का? हया शोधात होतो. इतक्यात पंजाबी पोशाख केलेली एक तरुणी दिसली. तिने आम्ही योग्य मार्गावर असल्याचे सांगितले आमची चौकशी केली. ती तरुणी उरळी येथील निसर्ग उपचार केंद्रात वजन कमी करण्यास आलेली होती. तिचे स्वतःचे ब्युटी पारलोर असल्याचे समजले. आमच्या रापलेल्या हाताकडे निर्देश करून ह्यावर काय करावे? असे विचारताच, सकाळी मॅाइचराइझर क्रीम वापरा ही सूचना मिळाली.

 दररोज प्रमाणे  माझी कुरकुर सुरु  झाली. तुला होणारा त्रास पाहता  तुला ही पदयात्रा जमणं कठीण दिसत  तू अधिक त्रास न घेता परत जाव असे मला  वाटते असे मी सुचवले ! पण जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही मला परत जाण्यास सांगू नका; हा सौ.सुनीताचा आग्रह. अश्या आमच्या गप्पा चालू असताना श्री मोहरील नावाचे गृहस्थ भेटले. ते यवतमाळ येथे राहणारे होते व आपल्या मेहुण्याकडे उरळीस आले असून सायंकाळचे रपेटीसाठी बाहेर पडले होते. माहेरचा पाहुणा भेटल्याचा आनंद सौ च्या चेहऱ्यावर दिसला. त्याच्याशी  गप्पामारत निघालो आणि फार्मर इन ह्या शिरीषने ठरविलेल्या हॉटेल वर कधी पोहचलो ते कळलेही नाही. हॉटेल छान होते. जेवण व राहण्याची सोय उत्तम होती.

.२३-२-९५    गुरुवार

सकाळी तयारी होताच बाहेर पडलो. पूर्ण विश्रांती नंतर फ्रेश वाटत होते. आपल्या आहारात
प्रोटीन कमी आहेत की काय?  त्यामुळेअधिक थकवा जाणवतो का ? असा विचार मनात आला .शिंदवणे गाव
मागे टाकले अन पुढे ६-७ किमी चा घाट ओलांडून जावा लागेल असे सडकेवरील पाटी सांगत होती . लहान
लहान टेकड्या दिसत होत्या. मग घाट कसा काय? लक्षात आलं की ह्या दोन तीन टेकड्या ओलांडण्यासाठी
ही पाटी असावी. १५००-१६०० फुटाची चढाई व नंतर पठार. सुनीताचे बळ वाढवावे  म्हणून रस्ता सोडून मधून
वाट कादू या का? माझा प्रश्न ! चालेल तिची संमती!अंतर जरी कमी होणार असले तरी चढ उभा होता .त्या
आधी पोटाची टाकी भरणे जरुरीचे होते. पुलाच्या सावली खेरीस कुठे छाया नव्हती. एक झाड दृष्टीस पडत
नव्हते. न्याहारी व विश्रांती नंतर एक तासात चढ पार केला पण पुन्हा जर अशी चढाई असेल तर राज मार्गाने
जाणे बरे, असे ठरवले.
"अगं! फार चढ  नव्हता. मुंब्रा येथील देवीला इतकाच तर चढ आहे !" माझे प्रोत्साहन.
 अजून वाघापूर,पारगांव गाठायचं आहे. तेव्हा, गती वाढायला हवी होती.

कुठे तरी चुकते आहे हे जाणवत होते ! वेळेचे बंधन ;अधिक अंतराचा पल्ला ; दोनच व्यक्ती ; त्यात एक स्त्री ,काय करावयास हवे होते ते समजत नव्हते. आतापावेतो माझ्या इतकच अंतर एक स्त्री असून आणि तेही माझ्याच इतक्या वेगाने- दुसरी एखादी महिला ह्या कसोटीला  उतरू शकली असती?  तिच्या ह्या जिद्दीचे आणि सहनशीलतेचे कौतुक माझ्या कडून होत नव्हते, ही तिची खंत होती. मला मात्र हवाई दलातील शिस्त व कठोर परिश्रम ह्यामुळे हे जाणवत नसे. सेनादलातील निवृत्त जवानाशी एक स्त्री कशी बरोबरी करेल ? हे मलाही समजत होतं, पण वळत नव्हतं.
  काल संध्याकाळी किती थकली होती ती ! तेव्हा तिला पटवून घरी पाठवून द्यायला हवं होतं का ? पण मीच स्वत: कबुल केलं होत की पुण्यापर्यंत जर आलीस तर तू ही यात्रा नक्की  पूर्ण करशील. आता माझा माझ्यावरील विश्वास दोलायमान झाला होता. अंतर वेळ, पोहचण्याच व निघण्याच टाइम टेबल ह्यामध्ये मन फिरत होत. त्या अष्ट विनायकाची, मुला बाळांची, नातवंडाची आठवण पण होत नव्हती. डोळ्यांना  दिसत होते ते मैलाचे दगड आणि डोक्यात होती फक्त बेरीज आणि वजाबाकी पूर्ण केलेल्या अंतराची आणि उरलेल्या मैलांची ! आठवलं म्हणून सांगतो यात्रा पूर्ण करून घरी आलो तरीपण पुढील काही रात्री स्वप्न पडायची ती देखील ह्या मैलाच्या दगडाची !

अष्टविनायकाची सहा ठिकाणं पश्चिम महाराष्ट्रा मध्ये पर्जन्य छायेच्या भागात. त्यामुळे पाऊस फार कमी. ,खुरट्या वनस्पती व लहान झाडे. मोठे वृक्ष नाहीच. काही काही वेळेस १०-१२ किमि सडकेच्या बाजूला एकही डेरेदार झाड नसायचे आणि झाडे असलीच तर बाभळीची. हे झाड छाया देवू शकते हेच कधी लक्षात आले नव्हते. कवियत्री  इंदिरा संत ह्याची बाभूळ ही कविता सौ.सुनीताने ऐकवली आणि शिरपूर व सिद्धटेक मधील बाभूळ वनाला धन्यवाद दिले. आता ऊन चांगलं जाणवू लागलं होतं. भोजन व विश्रांतीसाठी बाजूच्या एका निवांत ओसरीची निवड केली एक वृद्ध महिला सुपं-टोपल्यांना शेणमाती माखून ठेवत होती. तिची परवानगी घेवून पथारी लावली. काम आटोपून ती पाण्याची घागर घेवून आली. अर्ध्या तासाने ती परत आली आणि चहा घेण्यास घरात बोलावून नेले. प्राथमिक चौकशी झाली अन् त्यानंतर २ तास तिने आमचे बौद्धिक घेतले. ह्या वृद्ध स्त्रीने चार धाम यात्रा विना तिकीट व बरीचशी पायी केली होती. संसारातील दु:खांनी होरपळून निघालेल्या तिच्या जीवाला हेच औषध होतं. ती पुढे म्हणाली माझे मालक म्हणजे भोळे सांब मी मुलखाची  व्दाड ज्यावेळेस मनात येते तेव्हा घर सोडून यात्रेला निघून जाते. मनाला शांती लाभली की परत येते. अधून मधून खुशाली कळवते, पण पत्ता देत नाही. संत तुकारामाची गाथा पाठ ; तूकड्याची भजने पाठ ; आवाज गोड ताल व लय अंगात भिनलेली. बारा गावाचे पाणी प्यायलेली हि वृद्धा आम्हा उभयताना बरेच काही विचार करण्याजोगे देवून गेली. आमची यात्रा सफल होईल असा आशीर्वाद तर दिलाच, बाईना सांभाळून न्या. असा दम दिला. त्या शूर बाईचं नवा होत सौ .शेवंताबाई भोसले : रहणार पारगाव. ता.पुरंदर जिल्हा .पुणे.

 आता निघणं भाग होतं. बघता बघता बेलसर आलं. तिथे समजलं की शेतातून पायवाटेने गेल्यस ४-५ किमी अंतर वाचणार होतं. रस्ता चुकण्याचा प्रश्न  नव्हता  कारण जेजुरी गड सदैव दृष्टीत राहणार होता. ह्याच मार्गाने ५वा पर्यंत जेजुरीची शीव गाठली. वाटेत एका शिक्षिकेची भेट झाली. आम्हास केळकर वाड्यात त्या पोहचविणार होत्या अट एक होती ;प्रथम चहा त्यांचे कडे घ्यावयाचा. अट आनंदाने मान्य केली. संध्याकाळी ६-३० वा केळकर वाड्यात पोहचलो. उत्स्फूर्त  स्वागताने घरी आल्यासारखे जाणवले .प्रथम चहा ,गप्पा ; फराळ आणि नंतर गरमागरम जेवण याने मन तृप्त झाले. रात्री पाय शेकण्यास गरम पाणी मिळाले .ह्या मायेच्या उबेत रात्री झोप पण छान झाली.


२४-२-९५ शुक्रवार
              सकाळी नेहमी प्रमाणे ५.३०वा  जाग आली.पात:र्विधी आटोपून निघालो.वाटेत न्याहारी करून मोरगाव पर्यंतचे अंतर १० वाजेपर्यंत चालून गेलो. मंदिराबाहेर श्री.देशमुख ह्यांची पेढ्यांचे दुकानात भेट झाली. अष्टविनायकामध्ये हे प्रमुख ठिकाण खरेतर शास्त्राप्रमाणे येथून यात्रा करावी असा संकेत आहे. दर्शनाला गाभाऱ्यात गेलो तेव्हा श्री.यज्ञेश्वर शास्त्री ढेरे ह्यांची भेट झाली. आमच्या पदयात्रेबद्दल  जेव्हा त्यांना समजले; तेव्हा तुम्ही पदयात्रा करणारे पहिलेच दाम्पत्य आहात असे ते म्हणाले. सविस्तर वृत लिहा आणि मला एक प्रत धाडा असे ही सांगितले. ही यात्रा काही नवस म्हणून केली कि काय? असे विचारले! . नाही असे काही नाही! असे सांगताच त्यांना आश्चर्य वाटले. माझी तुम्हाला एक विनंती आहे. लेण्याद्री चे दर्शन घेवून यात्रा पूर्ण होताच बसने  डोंबिवलीस परत जावे असे सुचवले . पंढरीचे वारकरी देखील दर्शनानंतर बसने परत जातात . इप्सित पूर्ण झाल्यावर देहदंड नको. पण ग्रामदेवतेचे दर्शन घेवून गृह प्रवेश करा असा सल्ला दिला. त्यांचे विचार आम्हा उभयताना पटले अन तदनुसार आमचा कार्यक्रम योजिला. मंदिराचे ओवरीत विश्रांती घेवून सुपा गाठण्यास  निघालो सुपा येथे राहावयाची सोय होईल किंवा नाही ह्याची खात्री नव्हती . फक्त श्री भगवंत देशमुख हे एकच नावं माहीत होत. दुपारी ३ वा. मोरगाव  सोडलं . सुपा येईपावेतो  पायातील बळ संपत असल्याचे जाणवले . ठराविक अंतर पूर्ण करून देखील गाव दृष्टीस पडत नव्हत . सौ सुनिता हतबल झाली होती ,आता सुप्यात जर सोय होणार नसली तर चौफुला येथे मला बसमध्ये बसवून परत पाठवून द्या, अर्धी यात्रा आणि अर्ध अंतर पूर्ण केल्यावर हे नैराश्य का ? इतक्यात  पठाराच्या घळीत असलेले सुपा दिसले.

पुढील भाग  इथे वाचू शकाल

चिंतामणी - थेऊर --3

पदयात्रेची सुरुवात इथे वाचू शकाल.

१९-२-९५    रविवार
                               सकाळी जाग आली तेंव्हा सकाळचे ७ वाजले होते ,आज पुढचा प्रवास करावा की नाही ह्या विचारात होतो. प्रथम न्याहारी करू, मग बघू असा विचार केला आणि पोटभर नास्ता केला. चहा पोटात जाताच तरतरी आली .सौ.सुनीताला म्हणालो "इथे प.पु. गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे .ते असतील तर त्यांचे आशीर्वाद घेवू ".आश्रमातील शांत प्रसन्न वातावरण, बाजूला खळाळणारा पाण्याचा प्रवाह, मन उल्हसित करून  गेला. ह्या महाराजांची भेट होईल ह्याची खात्री नसते. योग जुळून आला होता. महाराजांचे दर्शन घेतले आशिर्वाद मिळाला. हॉटेलवर परत आलो. दिवसाच्या उजेडात हॉटेल ची भिकार अवस्था पाहून ह्यापेक्षा लोणावळा येथे जावून विश्रांती घ्यावी असे ठरले. कारण अंतर फार कमी म्हणजे  फक्त १५किमि होते. लोणावळ्यात हॉटेल पण चांगली होती ना? आता फक्त ११ वाजले होते तेंव्हा निघावे हेच बरे. टाटा कॉलोनी पासून डांबरी सडक सोडून आड मार्ग घेतला .प्रखर ऊन,उभा चढ पण जंगलची सावली ह्यामुळे लवकरच लोणावळा येथे  पोहचलो .चांगल्या हॉटेल मध्ये विश्राम, स्नान,कपडे धुणे ,बूट मोजे ह्याची दुरुस्ती करून ८ वाजता जेवून घेवून झोपी गेलो.

२०-२-९५ सोमवार
                               सकाळी ५ वा जाग आली सर्व कामे आटोपून बाहेर पडलो. आता सडक सरळ सपाट होती. मध्ये भोजनाचा आस्वाद ,विश्रांती  घेवून तळेगाव येथे ४ वा पोहचलो .इगल फ्लास्क कंपनीच्या शोरूम मधून दिसणारे तळेगावदाभाडेचे दृश्य फारच रमणीय वाटले .सेवानिवृतीनंतर असेच एखादे ठिकाण वास्तव्यासाठी निवडायला हवे! वाटेत जागाखरेदीसाठी.निघालात का ? अशी विचारणा झाली ? कारण हा भाग  विकसित होत होता .३४ कि मी अंतर आज पूर्ण झालं होतं! हॉटेल  मध्ये  आराम केला पुण्यास फोन करून  शिरीष व सौ सुगंधाला उद्या येत असल्याचे कळविले .

२१/२/९५
सकाळी नेहमीप्रमाणे ५ वाजता जाग आली .तयार होऊन पुण्याच्या मार्गाला लागलो. आज भाच्याकडे मुक्काम होणार होता.बाणेर मार्गे औंधला पोहोचलो. आमचे उन्हाने रापलेले चेहेरे व पायाची अवस्था पाहून सुगंधाला तर रडूच आले. ओळखीच्या डॉक्टर कडून पायावर उपचार केले व काही अॅन्टीबायोटीकस् घेतली. घरी फोन करून  खुशाली कळविली. आता २/४ दिवस मुक्काम करून निघा असा आग्रह झाला ,पण "सौ.सुनीताची सुट्टी अपुरी पडेल, तेंव्हा सकाळी पुढे निघणार" हा दृढनिश्चय बोलून दाखवला. शिरीष म्हणाला, मामा तू निघ आता .उरलेली सगळी ठिकाणं स्कूटरच्या टप्प्यात आहेत. काही त्रास  झाला तर कळव ! मी अन् सुगंधा स्कूटरवर येऊ तुम्हाला घ्यायला. मामा "तुझ्याकरिता  उरळीकांचन येथे फार्मर र्इन ह्या हॉटेलमधे जागा राखून ठेवली आहे". त्याची मदत लागल्यास अवश्य कळविण्याचे आश्वासन त्याला दिले .सौ सुनितानेही आता पायात पी .टी.शूज वापरण्याचे ठरविले रात्री लवकर झोपी गेलो.

२२ -२-९५ मंगळवार
                सकाळी ५-३० वाजता घराबाहेर पडलो पुण्याच्या शिवेपर्यंत शिरीष व सुगंधा आले होते.       हडपसर ते लोणी काळभोर प्रवास एका झटक्यात केला. न्याहारी करत असताना थेऊर कडे जाणारा बैलगाडी 
रस्ता माहित करून घेतला. त्या वाटेने दोन्ही बाजूस ऊसाची शेती होती. मधूनच येणारे पाण्याचे पाट व चिखल
इकडेतिकडे उडयामारीत पार करावे लागत होते. ५-६  कि  मी अंतर वाचणार होते.
सकाळी १०-३० चे सुमारास थेऊर येथे पोहचलो. वाटेत गावकरी मंडळी भेटली. चहापान झाले, मग भोजना नंतर जा असा आग्रह झाला. आता आधी दर्शन अन मग भोजन असे सांगताच मंडळीनी परवानगी दिली. सर्व लहानथोर मंडळी पाया पडली गावकरी मंडळीच्या ह्या प्रेमाने आम्हास देखील गहिवरून आले.



            मंदिरात एक विश्वस्त श्री पेंडसे ह्यांची भेट झाली. श्री चिंतामणी चे दर्शन घेतले महाप्रसादाचे     जेवण झाले. अवचित मेहूण म्हणून दक्षिणा कडोसरीस लावली. सौ सुनीताची खणा नारळाने ओटी भरली. नंतर त्यांनी प्रयाग धाम मार्गे उरळीकांचन कडे जाणारा जवळचा मार्ग दाखविला पुन्हा श्रीचे दर्शन घेवून थॆऊरचा निरोप घेतला.सभोवार शेती होती; हिरवळ होती पण छाया देणारे झाड नव्हते. उन्हाचा कडाका जाणवत होता. जेमतेम एक तास झाला असेल, सुनीताचा पित्तप्रकोप उसळून आला एक दोन उलट्या झाल्या अन उरलेल अंतर कसे पार पडणार ह्याची काळजी वाटू लागली. संपूर्ण प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने  जाणवली की सकाळी उल्हास वाटायचा ,दुपारी उन्हाचा त्रास उमेद घालवायचा अन संध्याकाळी मनावर नैराश्याची छाया पसरू लागायची ! आज तर भर दुपारीच अवसान गळालं ह्या पित्त प्रकोपाने  ! हळूहळू प्रयागधाम ला पोहचलो .मुक्तिधाम (नाशिक) सदृश या मंदिरास भेट दिली नाही.

पुढील भाग मोरगाव इथे  वाचू शकाल