Tuesday, 29 May 2012

बल्लाळेश्वर - पाली --2

पदयात्रेची सुरुवात इथे वाचू शकाल.
१७-२-१९९५...

सुधागड जवळ आला होता पण त्याला पूर्ण वळसा घातल्यावरच मंदिरात पोहोचणार होतो . सकाळी निघावयास उशीर झाल्याने सलग २ तासापेक्षा अधिक विश्रांती घेतली नव्हती. संध्याकाळ होताच दिवसभराचे श्रम चांगलेच जाणवू लागले होते .चालणं अशक्य वाटू लागलं होतं. पदयात्रेला सुरवात केल्या पासून हा सगळ्यात अधिक अंतराचा टप्पा होता.सायंकाळी फिरावयास बाहेर पडलेली मंडळी दिसू लागली होती. त्यांच्या कडून मंदिर ३-४ किमी दूर असल्याचे समजले अन पुलाच्या कट्ट्यावर बसकण घेतली. पुन्हा धीराने  मनाला उभारी दिली अन नेटाने पुढे निघालो. तेथील शाळेतील एक शिक्षक भेटले. त्यांचे बरोबर बोलत हे अंतर पार करून श्री धुंडीराजाचे मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर पालीच्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात गेलो .थंडगार फरसबंदीवर पाय पसरून बसताच शीण कमी होत असल्याचे जाणवले .आमच्या पदयात्रेचे प्रयोजन सांगताच राहण्याची जेवण्याची सर्व सोय उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी मान्य केली . पुढील १ तासात स्नानकरून देव दर्शन घेतले आणि भोजन करून मंदिरात दिलेल्या खोलीत गेलो शरीर ठणकत असल्याचे जाणवत होते, झोप येण्याची काही चिन्हे दिसत नव्हती ! उद्या संकष्टी आहे. परत इतकं अंतर चालवायचे आहे; जमेल का ? विचार करून मन थकलं अन् कधी झोप लागली ते कळले नाही.


१८-२-१९९५ शनिवार
                     नेहमीप्रमाणे  सकाळी ५ वा जाग आली सर्व अष्टविनायकांचे मंदिराजवळ सुलभ शौचालयाची व स्नानगृहाची सोय मुंबई महानगर पालिकेच्या सौजन्याने केलेली आहे. पूर्वी ही  सोय नव्हती तेंव्हा फार त्रास व्हावयाचा .चहापाणी देवदर्शन पूर्ण होई पर्यंत ७-३० वाजले होते.  मनाला आणि शरीराला  तयार केले आणि पालीचा निरोप घेतला .वाटेत चि. सौ .सुषमाला फोन केला खुशाली कळवली. एक तासात रेसल कंपनी च्या व्दारी पोहचलो न्याहारी झाली अन पुढे निघालो .पेडलीच्या जवळपास आलो. एक इसम घाई घाईने सायकलवरून आला आणि पायउतार झाला  अन म्हणाला आप कौन है? कहाँ जा रहे हो ? त्याच्या फाटक्या शरीराकडे पाहून ह्याचे पासून काही धोका होईल असे वाटले नाही. त्याचे पेक्षा आवाज चढवून आणि हातामध्ये असलेला २ फुटाचा टोर्च सरसावून मी जोशात विचारले आप कौन है ? क्या चाहते हो ? माझ्या हॉवरसॅककडे पाहत तो म्हणाला" वो लोग कहते है कि आप हिंग बेचते है". त्याला म्हटलं  अरे भाई आपकी  कुछ गलतफहमी हो गई है ? हम् हिंग  बेचते नही, हिंग लगाते है ! मराठीमध्ये शेंडी लावणे  ह्या प्रकारास हिंदी मधे हिंग लगाना असे संबोधले जाते. त्याच्या पाठीवर थोपटून इतरांनी त्याचा कसा मामा बनवला ते सांगितले.

माझ्या वाढलेल्या दाढीवर हाथ फिरवीत सौ .ला म्हणालो "हा माझ्या दाढीचा परिणाम असावा". मध्ये चहापानाचा कार्यक्रम झाला अन् कानसळ खेडे ओलांडून ३-४ किमी पुढे आलो असू, खणलेल्या सडकेमुळे वाहनांची कोंडी झाली होती. बाजूला झाडाच्या सावलीत विसावलो. इतक्यात एक जीप थांबली आणि कोणीतरी हाक मारत असल्याचे जाणवले. त्या जीप चालकाचा गैरसमज दूर करावा म्हणून गाडीकडे जावू लागलो तो आतून शिव्यांचा भडीमार सुरु झाला होता. कोण हा धटिंगण?
हे बघण्यास आत डोकावलो तर तो माझा वायुसेनेतील व डोंबिवलीत राहणारा मित्र श्री. कदम निघाला गेल्या संपूर्ण एक वर्षात तोंड न दाखवल्याने शिव्या घालत होता .मुकाट्याने गाडीत बसा. कुठे निघालात ह्या वेळेला ?काही बोलण्या पूर्वी तो बाहेर आला न दोघांच्या सॅक गाडीत टाकल्या पण जेंव्हा आमच्या पदयात्रेची कहाणी ऐकवली तेंव्हा तो खुष झाला. म्हणाला" मला माहित आहे तुझं डोकं अस काहीतरी नक्की ठरवत असणार. तूझा उपक्रम स्तुत्य आहे .तू नक्कीच पार पाडणार. ह्याच रस्त्यावर मी एक फार्महौस विकत घेतले आहे तिथे चल,ते बघ ,जेवण कर मग मी तुला इथे आणून सोडतो .त्याच्या फार्महौसच्या अन्नावर माझे नाव लिहिलेले असावे.! ह्या प्रकाराने मुक्कामावर पोहचण्यास उशीर होणार होता.

मध्ये पेडली येथे बोरं विकत घेतली. कारगावात राहणाऱ्या सौ .फुलवंती सकपाळ ह्या काल भेटलेल्या बाईकडे चहाचे निमंत्रण होते ना! बाई अजून भाजी विकून परतलेल्या नव्हत्या .तिच्या लहानग्या कडे निरोप ठेवला आणि खोपोलीच्या दिशेने वाटचाल सुरु केली. एव्हाना २०-२५ किमी चालून झाले होते. उन्हाचा ताप अन प्रवासाचा शीण जाणवत होता. कसंही करून अंधार पडण्यापूर्वी जंगलातून बाहेर पडावयाचे होते. सौ .सुनीताचे पायावर आलेले फोड त्रास देत होते पुढचा एक तास तरी गती अशीच ठेवणे जरूर होते .आता एकच उपाय; जय गजानन! श्री गजानन! असे उच्चारण करत मार्गी चालणे . मंत्राबरोबर गती वाढत गेली अन जंगल पार झाले. खोपोलीचा रस्ता रहदारीचा होता व सडकेवर दिवेही होते.

पाली फाट्यावर पोहचण्यास  ७-७:३० झाले. सौ. फारच थकून गेली होती. पोटामध्ये दुपारपासून  अन्नाचा कणपण गेला नव्हता. चतुर्थीचा  उपास फार कडक झाला होता, शरीर  थकलं होतं .संध्याकाळ फार उदासवाणी भासत होती. खरच हे अवघड कार्य आपल्याने पूर्ण  होणार कि नाही ही चिंता वाटू लागली होती .दररोज ३०-३२ किमी हे अंतर झेपणार कि नाही ?प्रवास एक महिना आधी सुरु करावयास हवा होता कि काय ?पायामध्ये बूट घालून चालण्याचा अधिक सराव करावयास हवा होता काय ? इत्यादी प्रश्न  भेडसावू लागले होते ?काय गरज होती ह्या पायापिटीची ?ह्यापासून आनंद होण्या पेक्षा दुख:च अधिक होणार कि काय असे वाटू लागले! निराशामय विचारांचा मनात कल्लोळ झाला .दोघांनी निघण्यात चूक केली की काय ?  असे वाटू लागले .४-५ जणांचा समावेश करून घ्यावयास हवा होता ! टपरीवर चहा घेतला आणि उरलेलं ४-५ किमी चे अंतर २ तासात कसेबसे पूर्ण केले. एका कट्ट्यावर समान ठेवले रिक्षा केली आणि एक हॉटेलमधे रूम घेतली. सुनीताने रूम मध्ये जाताच पायाचे फोड पंक्चर केले. आता पायाची आग वाढली. तिच्यासाठी अँटीबाओटीक गोळ्या व पुनर्जल आदि औषधॆ घेवून आलो. जेवण घेवून रूमवर आलो .पोटामध्ये  अन्न जाताच जरा बरे वाटले पाण्यात पाय ठेवून बरे वाटले, आग कमी झाली . मला चटकन झोप लागली पण ती ३-३० पर्यंत तळमळत होती.

पुढील भाग - थेऊर ; इथे वाचता येईल.

Friday, 11 May 2012

अष्टविनायकाची पदयात्रा - 1

प्रवास हा एक जीवन समृद्ध करणारा , जाणीव विशाल करणारा,  निरोगी छंद आहे .
अनुभवात भर टाकणारा हा छंद तरुणपणा पासूनच जोपासायला हवा. मुळात प्रत्येका मध्ये ही आवड असतेच, अगदी तान्हे मुल सुद्धा कुणाबरोबरही "भूर" जायला हपापलेले असते.  त्या प्रवृत्ती ची जोपासना वाह्यला हवी.  जेंव्हा जेंव्हा  अशी संधी प्राप्त होईल तेंव्हा तेंव्हा ह्या संधीचा उपयोग करून घ्यायला हवा.






पदयात्रा प्रारंभ

१५ फेब ९५
आज माघी पौर्णिमा सकाळी ५:१५ वाजता अष्टविनायक यात्रे साठी प्रस्थान ठेवले. २०-२५ दिवसांची सुनिता ची गैर हजेरी होणार होती म्हणून शाळा घर , योग विद्या धाम चाचणी परीक्षे चे पेपर तपासणे इत्यादी कामे व्हायची होती. दि. १४ ची रात्र जवळ जवळ जागूनच काढली म्हणा न !रात्रौ १ वाजता अंथरुणावर अंग टाकले तोच सकाळी ४ चा गजर चाबका सारखा कडाडला. धडपडत उठलो. प्रातर्विधी आटोपले , पूजा केली आणि कपडे चढवले. अरेच्या ! हे सॅकचे खोगीर राहिलेच की ! दोन्ही सॅकचे वजन केले, ५ व ७ किलो भरले . हे वजन घेऊन चालायचे होतं.

कमीत कमी पण आवश्यक वस्तूच बरोबर होत्या. ह्या वजनात कपात करणे अश्यक्य होते.
निघतांना चि. सौ सुषमा घरीच होती. तिने आईला प्रेमाने निरोप दिला. चि. समीर मात्र फारच भावनावश झाला होता . आईच्या पायी डोई ठेऊन त्याने अश्रूंना वाट करून दिली.
माझ्या पदयात्रेच्या विचारांची सदोदित आठवण तोच करून देत असे. शिवाय "बाबा ! तुम्ही नुकतेच सेवा निवृत्त झाला आहात , ताज्या दमाने ही यात्रा लवकर पूर्ण करा , आणखीन १ -२ वर्ष घालवलीत तर मग जड जाईल"  ही त्याचीच सूचना. आणि आता प्रत्यक्षात वेळ येताच तो गहिवरून गेला होता. " बाबा , आई ला सांभाळा आणि शक्य तिथून खुशाली कळवत जा ".

हा प्रचंड प्रवासाचा बेत आपल्या डोघांना पेलवणार आहे का? मन साशंक झालं होतं. ५-२५ वाजले होते तेंव्हा आता उशीर नको .घरच्या गजाननाला वंदन करून घराबाहेर पडलो. डोंबिवली ते शीळफाटा दरम्यान कुठेही मैलाचा दगड नव्हता, पण हे अंतर साधारणपणे १३-१४ कि मी आहे हे माहित होते .सकाळची प्रसन्न वेळ पौर्णिमेचा गारवा शांत वातावरण ह्यामुळे मन आनंदित झालं होतं. गतीपण चांगलीच होती. ६-१५ ला मानपाडा रोड सोडून खिडकाळीस जाण्यास वळलो.

७ वाजता खिडकाळीस पोहचलो. सौ सुनीताने शंका काढली "अहो !गणपतरावांचे दर्शनास जाण्या पूर्वी शंकररावांचे दर्शन घेणे जरुरीचे आहे ना". सगळं कसं नियमानुसार झालं पाहिजे . ७-३० वाजेपावेतो शीळफाटा गाठला .सकाळी घेतलेला चहा ह्यावेळेपावेतो जिरून गेला होता. गाडीला पेट्रोलची गरज होती, चहा घेण्या मध्ये १५-२० मिनिटे गेली .चहा काढ्या सारखा होता .हळूहळू हि व्यसनं सोडायला हवी .देवदर्शनाने उपरती झाली कि काय ?आता हायवे (NH4)वरून आमची पैदल गाडी जोशात निघाली होती.

तेवढयात "अहो पाहिलात का मैलाचा दगड तुम्ही शोधात होतात ना ? सौ. ने बोट दाखविले. ह्यापुढील आमच्या प्रवासातील हा जिवलग साथीदार. दगडावर पनवेल २० कि.मी.असल्याचे सूचित केलेले होते. "आता आपल्याला प्रत्येक कि.मी. ला कितीवेळ लागतो ते पाहता येईलना ?" इति सौ. माझं अनुमोदन ! पुढचे १०-१२-किमी गेल्यावर आमच्या लक्षात आलेकी १ किमि अंतर कापण्यास आम्हाला साधारणपणे १२ मिनिटे लागतात. अरे वा ! म्हणजे आमच्या गाडीचा वेग ताशी ५ किमी चा आहे .म्हणजे दुपारी १ च्या सुमारास आम्ही पनवेल ला पोहोचणार तर ! हळू हळू तळोजा आलं रेल्वे स्टेशन मग एसटी डेपो मग जकात नाका एव्हाना ऊन चांगलच जाणवू लागलं होतं. गॉगल, टोपी, पाण्याची बाटली अशी एकेक वस्तू बाहेर पडू लागली होती . आत्ता आपण दर २०-२५ मिनिटांनी थांबत जावू या का ? सौ. ची सूचना वजा विनंती. आता चालण्याचा वेग ही मंदावला होतां .मलाही उन्हाचा कडका जाणवू लागला होतां. कळंबोली यार्डात आम्ही पोहचलो होतो २५ ते ३०कि.मि. चा टप्पा ठरविण्यात आपण काही चूक तर केली नाही ना ?

झाडाच्या सावलीत थोडा विसावा घेवून पोलिस चौकी पर्यंत मजल मारली. तिथे थांबलो तो चौकशी सुरु झाली. "कोण? कुठे चाललात, सी.बी. आय ची माणसा आहात कि काय ?". माझ्या युनिफोर्म चे कपडे असे कामाला येतील असे वाटले नव्हते .थोडा वेळ विश्रांती घेवून निघालो आणि मोठया हिमतीने पनवेल थांबा गाठला. लॉज मध्ये शिरलो. अंघोळ केली, भोजन केले आणि विश्रांती घेतली .आजचा ३३ किमी चा प्रवास तर उत्तम पार पडला होतां. आता पुढे १५ दिवस हे दररोजचे रुटीन राहणार आहे.

रात्री पाय शेकायला गरम पाण्या ची सोय होऊ शकेल का ? आमच्या पदभ्रमणा बद्दल जेव्हा लॉजच्या मालकाला समजलं तेंव्हा फारच आश्चर्यचकित झाला. 'ग्राहकांचं समाधान हाच आमचा फायदा ' हे सिद्ध करून दिले त्याने. रात्री १०:३० ला फोनेवरून पाणी मिळाल्याची खात्री त्याने करून घेतली. पायांची निट काळजी घेऊन ११ वाजता निद्राधीन झालो.

१६-२-१९९५
सकाळी ३-३० ला जाग आली. लवकर निघायचे म्हणून तयारीला लागलो तेंव्हा लक्षात आलं कि दाढी करावयाचे सामान व टूथपेस्ट घेण्याचे साफ विसरलो आहोत. सकाळी ४-४५ वा हॉटेलच्या बाहेर पडलो .थंडी बऱ्यापैकी जाणवत होती .थंडगार बोचणारे वारे अन् ठणकणारे शरीर सोबत घेवून आता अंतर पार करावयाचे होते मनाची हिमंत बांधली आणि झपझप पावलांना गती दिली. पण भरधाव वाहतूक अन् खणून ठेवालेला रस्ता ह्यामुळे आमची गती जेमतेम ४ कि.मी. झाली होती. सडकेवरून येणारा प्रत्येक ट्रक आणि टँकर हवेचा प्रचंड झोत आमच्यावर फेकून आमची गती कमी करायचा, शिवाय त्यांचा प्रखर प्रकाश आमच्या डोळ्यांना त्रास देवून जायचा. डाव्या बाजूने चालले तर मागून येणाऱ्या गाडीची भीती आणि उजव्या बाजूने चालले तर गाडीच्या धुराचा त्रास. शेवटी उजव्या बाजूने चालण्याचे ठरवले .पहिला थांबा २ तासांनी घेतला. गुरुवारचा उपास जाणवू लागला होता तेंव्हा 'चौक' ह्या गावी सुनिता साठी फलाहार व माझ्यासाठी खास कांदाभजी, असा नास्ता झाला.

हळूहळू खालापूर जवळ केलं. ह्या आधी गावातून घेतलेला शॉर्टकट फायद्याचा ठरला होता. दुपारी २ चे सुमारास एका ढाब्यावर जेवण केले . महड फाट्यावर पोहचण्यास २:४५ झाले. महडला जाणारी डांबरी सडक दिसू लागली . एका गावकऱ्यास विचारले कि जवळचा रस्ता कोणता त्याने शेतातून जाणारी एक पाय वाट दाखवली आणि सांगितले कि तुम्ही अगदी मंदिराजवळ पोहोचाल ३:३० ला आम्ही वरदविनायकाच्या मंदिरात पोहचलो. मंदिरात श्री .देशमुख ह्यांची भेट झाली आम्ही ही यात्रा चालत पूर्ण करण्याचा आमचा मनोरथ त्यांना सांगीतला. त्यांना फार कौतुक वाटले. सर्व सोय व्हावी म्हणून आमची सोय श्री .कोशे ह्यांच्या घरी केली. चहा झाला. विहिरीस भरपूर पाणी अंघोळ कपडे धुणे वाळवून पुन्हा भरून घेणे ही कामे आटोपली थोडी विश्रांती घेवून ६-३० ला मंदिरात जावून बसलो. सायंकाळची आरती झाली. नंतर थोडा फराळ करून झोपी गेलो. निजण्यापूर्वी थोडी पायांची निगा केली.

१७-२-९५
शुक्रवार सकाळी ५-३० वाजता अंघोळ करून तयार झालो. मंदिरात जाऊन देवदर्शन करून आलो. श्री .कोशे गावाच्या शिवेपर्यंत निरोप देण्यास येणार होते. जाण्याचा मार्ग बांधावरून असल्याने थोडे उजाडण्याची वाट बघावी लागणार होती . यात्रा पूर्ण होताच खुशाली कळविण्याची विनंती ते सारखे करीत होते. पाणंद ओलांडून मोडका पूल पार केला आणि खोपोली-अलिबाग रस्त्याला लागलो. इथेच एक विठ्ठल मंदिर आहे त्याला प्रती पंढपूर म्हणतात .ह्याचा रस्त्याने पुढे ५ कि.मी. पार केल्यावर पाली फाटा लागला. अलिबाग रस्ता सरळ पुढे गेला. आम्हाला कारगाव मार्गाने जायचे होते. रस्ता छान होता दोन्ही बाजूस मोठाले वृक्ष होते. अधूनमधून कारखानेही दिसत होते. कारगावला नास्ता केला. येथून पुढे थोडा घाटाचा रस्ता होता. सडकेचे काम सुरु होते. आजूबाजूस जंगल होते .कामगार मंडळी भेटत होती. इतक्यात कुणीतरी मागून हाक मारत आमच्या कडे धावत येत होतं. एक खेडूत स्त्री आमच्या मागे धावत आली आणि म्हणाली तुम्ही पुढे कुठे निघालात, बसचा थांबा तर मागे राहिला. पण आम्ही जेंव्हा तिला आमचा पाई चालत जाण्याचा इरादा सांगितला तेंव्हा तिला नवल वाटले. तिची उत्सुकता ओसंडून वाहत होती. ती धरणग्रस्त महिला असून अहिरवाडी येथे राहत होती तिचे नाव होते फुलवंती श्रीरंग सकपाळ . भाजी विकून ती संसाराला हातभार लावीत होती . तिच्या गावा पर्यंत वेळ छान गेला. चहा घेण्याचा आग्रह झला पण परतीच्या प्रवासात तो घेऊ असे आश्वासन देऊन पुढे निघालो. सौ.सुनिता आतापावेतो वापरत असलेल्या चपलांमुळे पायाला फोड आले होते. त्यावर Band Aid चा इलाज करून घेण्यास झाडाच्या सावलीत थोडे थांबलो. इतक्यात आम्हाला ओलांडून पुढे गेलेल्या तीन कार एकमेकांवर आपटल्यामुळे प्रचंड आवाज झाला. समोरून येणाऱ्या बैलगाडीचे बैल उधळेले अन् त्यामुळे समोरच्या कार चालकाने ब्रेक लावले. सुरक्षित अंतर न ठेवल्याने मागील दोघे त्यावर धडकले .कुणीही जखमी झाले नव्हते. आमच्या मदतीची काही गरज नाही हे पाहून पुढे निघालो . जांभूळपाडा येथे एका टपरीतून बटाटेवड्याचा सूरेख वास आला, आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जाणे अशक्य. तेथे समजले की इथून एक पायवाट लोणावळया पर्यंत जाते. अंतर २०-२२ कि.मी. आहे पण वाट फार कठीण आहे. वाटाड्या शिवाय शक्य नाही. उद्या सकाळी एखादा वाटाड्या पाहून थांबावयास सांगून ठेवले. ह्याच गावातले दोन वर्षापूर्वीचे, पुराचे थैमान आठवले. आता येथे सुंदर गणपती मंदिर आहे. सकाळी ठाकर मंडळी दूध व भाजी विकण्यास येतात ते अधिक माहिती देवू शकतील असे कळले. त्यांची भेट घ्यायला हवी.

हळूहळू परली गाव दिसु लागले. इथे एक कलिंगडाचे शेत दिसले. गाडी मध्ये माल भरणे चालू होते ,भाव विचारला पण आम्हा शहरवासीय मंडळीना बघून त्याने अवास्तव किंमत सांगितली .पुढे पेडली गावी चहा ऐवजी काही थंड पेय घ्यावेसे वाटले. म्हणून फ्रूटी घेतलं. ह्या केमिकल पेक्षा निसर्ग पेय घेतले असते तर फार बरे झाले असते असे वाटू लागले. हा विचार अर्थातच सौ.च्या मनातला. पण म्हणतात ना स्वभावो दुरतिक्रमा:. आपापसात वाद घालणे म्हणजे शक्ती क्षय शिवाय आधीच थकलेले शरीर त्यात ही मानसिक मरगळ. एव्हाना २५कि.मि. पेक्षा अधिक अंतर पूर्ण झाले होते .सावलीत थोडी विश्रांती घेतली . प्रवासात वडा-पाव शिवाय काही मिळत नव्हतं आणि अजून बराच अंतर कापावयाचे होते ,रडत खडत पायपीट सुरु केली आणि रायासाल कंपनीचे गेट जवळ केले. कंपनीच्या कॅन्टीन मध्ये चहा फार छान होता. आमच्या प्रवासाचे प्रयोजन समजून तो पैसे घेत नव्हता. तेंव्हा उद्या सकाळचा नास्ता इथेच घेवू असे सांगितले व सुटका करून घेतली.

*************************************
पुढील भाग - बल्लाळेश्वर;  इथे वाचता येईल.